आष्टी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला लागावे. खरीप हंगाम पूर्व व प्रथम टप्प्यात महत्त्वाच्या कामाबाबत जागरूक राहून कार्यवाही करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी वाढता उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्याकरिता तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकाचे सरळ वाणाचे घरचे बियाणे वापरावे. बियाणे वापरताना बियाण्याची घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासून घ्यावी. योग्य उगवण क्षमतेचे घरचे बियाणे वापरल्यास उत्पादन खर्चात बचत होईल. पेरणी पूर्व बीजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबियम, पी. एस. बी. ट्रायकोडर्मा पावडर व बुरशीनाशकाचा वापर करावा. सोयाबीन पिकांची जास्तीत जास्त पेरणी यंत्राद्वारे करावी. उन्हाळी कांद्याची साठवण करण्याच्या कामात शेतकरी आहेत. जोड कांदा, चिंगळी, ढेंगळे युक्त कांदे वेगळे करुन एक व दोन नंबरचे चांगले कांदे चाळीत साठवावेत. येत्या हंगामात फळबाग लागवड करावयाची असल्यास मग्रारोहयो व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. येणारा खरीप हंगाम यशस्वी करण्याकरिता शेतकरी कृषी निविष्ठा विक्रेते, सेवा पुरवठादार, प्रगतशील शेतकरी, कृषी विद्यापीठ, तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने काम करणार आहोत. काही अडीअडचणी असल्यास कृषी विभागासी संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.
....
आष्टी तालुक्यातील प्रस्तावित खरीप क्षेत्र (हेक्टरमध्ये) -२०२०-२०२१ २०२१-२०२२
कापूस -२५,३७२ २१,५७२
तूर -१७,६०४ २१,६०४
उडीद - १७,८७३ १८,९४९
मूग - ९,०४७ ९,०००
बाजरी -१६,४५९ १६,०००
मका - १,९६६ १,५००
सोयाबीन - ६,१०४ ६,१००.