लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील आझादनगर व गौतमनगर भागातील रस्त्यांची व नाल्यांची कामे पूर्ण करावीत. परिसरात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडवावा, या व इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून माकपच्या वतीने नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शहरात सर्वच भागातील रोड व नाल्यांची बांधकामे सुरू आहेत. मात्र माजलगाव शहरातील आझादनगर व गौतमनगर यापासून वंचित आहे. पाइपलाइन व्यवस्थित नसल्याने या भागात वारंवार पाणीप्रश्न निर्माण होतो. या भागात रस्ते न झाल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. त्याचबरोबर नाल्याचे बांधकाम झालेले नाही. या नाल्या रस्त्यातून आडव्या-उभ्या काढण्यात आलेल्या आहेत. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. या भागातील पाइपलाइन वारंवार फुटत असल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. शहरात आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र काही उपयोग झाला नाही. यामुळे या भागातील नागरिकांनी नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.
उपोषणात कॉ. सादेक पठाण, कॉ. शेख महेबूब, कॉ. फारूख सय्यद, कॉ. शेख समीर, कॉ. शेख फयाज, कॉ. शेख चुत्रू, कॉ. शेख अन्वर, सय्यद अल्लाउद्दीन हे सहभागी झाले आहेत.