पाटोदा : तलवारीने ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देताच अंमळनेर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन सोडून दिले. या आरोपीविरुध्द अटकेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रारदाराचा भाऊ पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसला आहे. अंमळनेर पोलीस सातत्याने गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.राजेंद्र पांडुरंग वारे (रा. खोपटी, ता. शिरुर कासार) असे उपोषणास बसलेल्याचे नाव आहे. खोपटी हे गाव अंमळनेर पोलीस ठाण्याच्या कक्षेत आहे. राजेंद्र यांचा भाऊ अजिनाथ पांडुरंग वारे यांना शेषनारायण संतराम खरमाटे, वैजिनाथ कारभारी खरमाटे, संतराम खरमाटे, गोपाळ संतराम खरमाटे, भास्कर हरिश्चंद्र खरमाटे यांनी २९ आॅक्टोबर २०१८ रोजी तलवारीने ठार मारण्याचा प्रयत्न केला. अजिनाथ यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या प्रकरणातील आरोपी राजरोस फिरतात मात्र अंमळनेर पोलीस कार्यवाही करत नसल्याने राजेंद्र यांनी १ मार्च २०१९ पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेषनारायण यास ताब्यात घेतले आणि राजेंद्र यास उपोषणापासून परावृत्त केले. प्रत्यक्षात शेषनारायण याच्यावर अटकेची कारवाई केली नाही.
आरोपीच्या अटकेसाठी ठाण्यासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:30 AM