कडा : शेतातील गोठ्यात झोपलेल्या रामदास पांडुरंग चव्हाण (३५ ) या तरूणाच्या तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना पिंपरखेड येथे मंगळवारी ( दि. २३ ) सकाळी उघडकीस आली होती. या हत्येचा उलगडा झाला असून मृताच्या वडिलानेच रोजच्या वादाला कंटाळून हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी रामदास चव्हाण सोमवारी रात्री घरापासून जवळच असलेल्या शेतातील गोठ्यात झोपण्यासाठी गेला होता. मंगळवारी सकाळी रामदासचे वडिल शेतात गेले असता त्यांना गोठ्यात रामदास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याच्या तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी कसून तपास करून हत्येचा उलगडा केला असून मृताचे वडील पांडुरंग चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दारुडा मुलगा घरात घालायचा वाद मृत रामदासला दारू पिण्याचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन घरी आल्यास पत्नी, आई-वडील यांच्यासोबत वाद घालायचा. रोजच्या वादाला कंटाळून मंगळवारी पहाटे पांडुरंग चव्हाण यांनी गोठ्यात झोपलेल्या रामदास याच्या तोंडावर आणि गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. पोलिसांनी पांडुरंग चव्हाण यांना ताब्यात घेतले असून दडवून ठेवलेली कुर्हाड व कपडे जप्त करण्यात आले आहेत.