बीड : शेतीचा वाद मिटविण्यावरुन झालेल्या वादातून डोक्यात काठीने व लोखंडी पट्टीने डोक्यात मारुन जखमी केल्याप्रकरणी दोषी धरुन जिल्हा व सत्र न्या. २ अनिरुद्ध एस. गांधी यांच्या न्यायालयाने ज्ञानदेव यादव भवर आणि किसन ज्ञानदेव भवर या पिता- पुत्राला दहा वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.१९ जानेवारी २०१५ रोजी ज्ञानदेव व त्याच्या मयत भावाची मुले (रा. मोरेवाडी, ता. आष्टी) यांच्यात जमिनीवरुन सुरु असलेला वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी मोरेवाडी येथे रोहीदास मारुती मोरे याने रामराव दुलबा शेलार यासह बैठक बोलावली होती. त्यावेळी ज्ञानदेव आणि किसन यांनी रामराव यास आमचा वाद मिटवणारा तू कोण? असे म्हणून रामराव शेलार यास काठीने व लोखंडी पट्टीने मारहाण केली. तर रोहीदास यास तू या प्रकरणात साक्षीदार का झाला असे म्हणून मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. जखमी रोहीदास मोरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार किसन व ज्ञानदेवविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या ठाण्याचे तत्कालीन सपोनि ए. एस. शेख यांनी तपास करुन दोेषारोप पत्र दाखल केले. हे प्रकरण बीड येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या-२ ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय पुराव्यांचे अवलोकन न्यायालयाने केले. तसेच सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्या.- २ ए. एस. गांधी यांनी किसन ज्ञानदेव भवर आणि ज्ञानदेव यादव भवर यांना कलम ३२६ भादंविनुसार दोषी धरुन दहा वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, तर कलम ३२४ नुसार दोषी धरुन प्रत्येकी तीन वर्ष सश्रम कारावस आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे राम बिरंगळ यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून शिवाजी डोंगरे यांनी त्यांना मदत केली.
मारहाणप्रकरणी पिता- पुत्राला दहा वर्षे सश्रम कारावास, २५ हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:32 PM