बीड : पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणार्या नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.
या प्रकरणात पीडित मुली १२ व १६ वर्षाच्या आहेत. मोठ्या मुलीवर या बापाची नजर गेली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मोठ्या मुलीवर अत्याचारास सुरुवात केली. अनेक दिवस मोठी मुलगी बदनामीपोटी गप्प राहिली. तिच्या गप्प राहण्याचा फायदा घेत त्याने छोट्या मुलीकडे मोर्चा वळवला. मोठी मुलगी शाळेत व त्यांची आई बाहेर गेल्यानंतर तो तिच्याशी लगट करायचा. यातून तिला धमक्या देत अत्याचार करु लागला.
ही बाब पीडित मुलींनी आईला सांगितली. आईलाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. तिने धीर धरत या नराधम बापाविरुद्ध आष्टी ठाण्यात फिर्याद नोंदवली. पीडित मुलींनीही तक्रार दिली. त्यानुसार नराधम बापावर कलम ३७६ (२) (एच), ३२३, ५०४, ५०६ भादंवि, कलम ४, ६, ११ लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. आष्टी ठाण्याचे तत्कालीन पो. नि. दिनेश आहेर यांनी या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली. तपासाअंती दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष न्या. व अति. जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयात झाली.
सरकारी पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करुन जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी युक्तिवाद केला. त्यावरुन बापास लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ५ (एन) व भादंविचे कलम ३७६, ५०६, ५११, ३२३ प्रमाणे दोषी ठरवत १० व ५ वर्षे एकत्रित सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अजय राख यांना सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे, नामदेव साबळे व इतर सहायक सरकारी वकिलांनी सहकार्य केले. तपास अधिकारी म्हणून दिनेश आहेर यांनी काम पाहिले.
वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले
पीडित मुली, आईची साक्ष महत्त्वपूर्ण बहुतांश प्रकरणात न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर फिर्यादी साक्ष बदलात. मात्र, येथे पीडित मुलींनी दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. तसेच त्यांच्या आईची साक्षही महत्त्वाची ठरली. या साक्षीबरोबरच वैद्यकीय पुरावेही बापास शिक्षा देण्यास महत्त्वाचे ठरले.