बीड : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मेमध्ये तापमान काही अंशी वाढले, तरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे तीव्रता कमी जाणवली. तसेच लॉकडाऊनमुळे संचारबंदीत लोक घरातच असल्याने उष्माघातापासून बचाव झाला. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत शून्य तर मागील तीन वर्षांत केवळ दोन मृत्यू झाले आहेत.
मागील वर्षभरापासून कोरोनाशी जिल्हा झुंज देत आहे. संसर्ग पसरू नये म्हणून शासन निर्देशानुसार प्रशासनाकडून लॉकडाऊन, संचारबंदीचा अंमल सुरू आहे. त्यामुळे लोक घरातच असल्याने तसेच मागील काही दिवसांत पारा घसरल्याने उष्माघातापासून बचाव झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस लोक गांभीर्याने घेत नव्हते. परंतु, बाधितांच्या आकड्यांचा आलेख उंचावत राहिला. त्याचबराेबर मृत्यूसंख्या धक्क्यावर धक्के देत राहिली. त्यानंतर मात्र लोक स्वत:च संचारबंदी नियमांचे भान ठेवू लागले आहेत. जिल्ह्यात यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढला. त्यामुळे संचारबंदीचा अंमल सुरू आहे. यंदा मार्चपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. एप्रिलमध्ये पारा चांगलाच वाढला. मागील काही वर्षांमध्ये मेमध्ये आलेला प्रखर उन्हाचा अनुभव यंदा मात्र जाणवला नाही. मेमध्ये तापमान कधी ३८ तर कधी ३९ अंशापर्यंत राहिले, मात्र धग मोठ्या प्रमाणात जाणवत होती. अनेकांना ती असह्य झाली परंतु एसी, पंखा, कूलरचा वापर होत असल्याने दिलासाही मिळाला. जाणकारांच्या मते थंडीच्या लाटेने घरात असाल तरीही मृत्यू ओढावू शकतो, मात्र उन्हाची लाट गरम असली तरी ती रोखण्यास पंखा, कूलरची हवा पुरेशी ठरते. बीड जिल्ह्यात उष्माघाताच्या तुलनेत वीज कोसळून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी उन्हात फिरण्याचे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. ओआरएस, लिंबू-सरबत घ्यावे, असे डॉ. पी.के. पिंगळे म्हणाले.
उन्हाळा घरातच
पारा वाढला तरी
मार्च, एप्रिल आणि मेमध्ये अवकाळी पावसामुळे वातावरणात अनेकदा बदल होऊन उन्हाची तीव्रता कमी झाली. मागील काही दिवसांपासून तर तोत्के वादळाचा परिणाम म्हणून वातावरणातील बदलामुळे वैशाख वणव्याचा त्रासही कमी जाणवत आहे. उन्हात फिरण्याचे तसेच काम करण्याचे दिवस राहिले नाही. त्यामुळे आरोग्याबाबत दक्षता घेत लोक घरातच थांबले आहेत.
-------
ऊन वाढले तरी...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३७, ३९, ४०, ४१ अंशापर्यंत तापमानाचा पारा चढला. मेमध्ये ३६, ३८, ३९ अंशापर्यंतच तापमान राहिले. १८ मे रोजी कमाल ३४ तर किमान तापमान २५ राहिले, तर १९ रोजी किमान २ तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस होते.
-----
यावर्षी आतापर्यंत उष्माघाताची नोंद शून्य आहे. उष्माघात टाळण्यासाठी शक्यतो शेतातील कामे सकाळी लवकर व दुपारी ऊन उतरल्यावर करावी. उन्हाच्या वेळी सावलीत आराम करावा. भरपूर पाणी प्यावे. सरबत, पन्हे इत्यादी प्राशन करावे. - डॉ. संजय कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
----------
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
२०१९ - ०२
२०२० - ००
२०२१- ००
-----------