- नितीन कांबळे
कडा (बीड ) : आजीआजोबांसोबत शेतात गेलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या दरम्यान किन्ही येथे उघडकीस आली. चार दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील वाघदरा शिवारात एका शेतकऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना उघडकीस आली. स्वराज सुनील भापकर असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
किन्ही गावातील स्वराज सुनील भापकर हा शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून स्वराजला उचलून नेले. त्याच्या आजी-आजोबांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. त्यानंतर वन विभागाच्या पथकासह ग्रामस्थांनी शोध घेतला असता स्वराजचा मृतदेह झाडाझुडपात पडलेला आढळून आला. तालुक्यात चार दिवसात बिबट्याने दुसरा बळी घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.