बीड : मला त्रास होतोय, मी नोकरी सोडतेय... असा अर्ज सोशल मीडियावर टाकणाऱ्या महिला डॉक्टरने पुन्हा व्हॉटस्ॲपवरूनच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे रजा पाठविली आहे. त्यामुळे सध्या एकाच डॉक्टरवर कामाचा ताण वाढला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या की, सामान्यांवर उपचार, असा प्रश्न हजर डॉक्टरांसमोर आहे. यामुळे जातेगाव परिसरातील लोकांचे आरोग्य बिघडत चालल्याचे दिसते.
गेवराई तालुक्यातील जातेगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. पल्लवी झोडपे यांनी मार्च महिन्यापासून एकटीने सेवा दिली; परंतु चार दिवसांपूर्वी त्यांच्याशी गावातीलच दोघा भावंडांनी इंजेक्शन देण्यावरून वाद घातला. असे प्रकार वारंवारच घडत असल्याने तक्रारी तरी किती करू, यामुळे आता मीच नोकरी सोडतेय, असा अर्ज डॉ. झोडपे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी टीएचओंकडे व्हॉटस्ॲपवरून रजा टाकली. यात वाद घालणाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे; परंतु आता याच केंद्रात नव्याने रुजू झालेले डॉ. योगेश जाधव हे एकमेव वैद्यकीय अधिकारी आहेत. अगोदरच नवीन, त्यातही लसीकरण, ओपीडी, प्रतिबंधात्मक उपाययोजन, जंतनाशक मोहीम आदी कार्यक्रम आल्याने त्यांच्यावरही कामाचा ताण वाढला आहे. याचा परिणाम आरोग्यसेवेवर होत असून, सामान्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित महिला डॉक्टरने राजीनामा देऊन जागा मोकळी करावी; अथवा केंद्रात तात्काळ हजर व्हावे, अशी मागणी जाेर धरू लागली आहे. डॉ. योगेश जाधव यांना मंगळवारी संपर्क केला, तेव्हा ते म्हणाले, ताण खूप आहे. मी संबंधितांना खूप कॉल केले; पण त्यांनी घेतले नाहीत, असे सांगितले.
---
काेण काय म्हणतेय...
वाद घालणाऱ्या दोन लोकांच्या नावाचा उल्लेख करून टीएचओंकडे व्हाॅटस्ॲपवरून रजा दिली आहे. यात निश्चित वेळ दिली नाही. अद्याप मी राजीनामा दिलेला नसून, त्या दिवशीपासून ड्यूटीवरही गेले नाही.
-डॉ. पल्लवी झोडपे, वैद्यकीय अधिकारी जातेगाव
--
माझ्याकडे व्हाॅटस्ॲपवरून रजा आली आहे. योग्य त्या कार्यवाहीस्तव हा अर्ज डीएचओंकडे पाठविला आहे. पुढील निर्णय ते घेतील. केंद्रातील सेवेबाबत नियोजन केले आहे.
-डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी गेवराई
--
टीएचओंनी पाठविलेला अर्ज मिळाला आहे. असे अचानक जाणे योग्य नाही. नोटीस बजावून योग्य ती कारवाई केली जाईल.
-डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड