पाटोदा : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेला लॉकडाऊन व त्यामुळे सर्वच बाबतीत आलेल्या बंधनामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच, ग्रामीण भागातील शेतकरी रानडुकरांच्या त्रासामुळे मेटाकुटीला आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात रात्रीचा दिवस करावा लागत आहे.
तालुक्यातील बेनसुर, रामवाडी, भायाला, रोहतवाडी, थेरला, कचरवाडी, वाघिरा या भागात दहा वर्षांपूर्वी उन्हाळी भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. मात्र, आता या भागात पाण्याची उपलब्धता वाढलेली असताना, रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकरी भुईमुगाचे पीक घेणे टाळू लागले आहेत. रामवाडी, घाटेवाडी, भायाळा, थेरला, रोहतवाडी व कचरवाडी या परिसरात डोंगरपट्ट्याचा भाग असल्याने रानडुकरांना लपण्यास जागा आहे. जवळच भायाळा साठवण तलाव आहे. त्यामुळे डोंगरपट्ट्यात राहण्यासाठी सुरक्षित जागा, पिण्यासाठी तलावाचे पाणी व खाण्यासाठी शेतातील भुईमूग व अन्य पिके त्यामुळे हरीण व रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हरीण व रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. रामवाडी येथील दिलीप अश्रुबा राऊत या शेतकऱ्याने शेतातील भुईमुगाच्या पिकाचे हरीण व रानडुकरापासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या कडेने जुन्या साड्यांचे कुंपण घातले आहे, तर डुकरांना हाकलून लावण्यासाठी शेतातच बाज टाकून रात्रभर जागरण करीत आहेत. रानडुकरांनी आतापर्यंत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जखमी केलेले असले, तरी शेतकरी पीक पदरात घेण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.
क्षेत्र वाढण्याऐवजी घटलं
पाटोदा तालुक्यात डोंगरपट्ट्यातील शेतकरी उन्हाळ्यात भुईमुगाचे पीक घेतात. अलीकडील काळात पाण्याची उपलब्धता वाढली असल्याने, उन्हाळी भुईमुगाचे पिकाखालील क्षेत्रात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता पाण्याखालील क्षेत्र वाढलेले असताना, उन्हाळी भुईमुगाचे पिकाखालील क्षेत्र मात्र डोंगरपट्ट्यात दिवसेंदिवस रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळे कमी झाले आहेे.
-------
फोटो ओळी : रात्रीच्या वेळी बाज टाकून शेतकरी भुईमुगाच्या शेतात रात्र जागून काढत आहेत.
पिकांचे रक्षण करण्यासाठी कडेने साड्यांचे कुंपण लावून शेतकरी दक्षता घेत आहेत.