बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. दरम्यान, ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून करावी, अशा सूचनादेखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, ॲप ओपन होत नसल्याने शेतकऱ्यांना तक्रारी करता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑफलाइन पंचनामे करून त्यानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
खरीप हंगामात जवळपास ७ लाख ४० हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. मागील दोन दिवसांत जवळपास सर्वच महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे ॲपवरून करावे, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, मोबाइल नसल्यामुळे व सर्व्हर डाऊन असल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ऑफलाइन पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
...
हाताळणी कोण शिकवणार?
शेतकऱ्यांना ॲप वापरणे कठीण जात आहे. अतिवृष्टीचे पंचनामे ७२ तासात देण्याचे आदेशदेखील देण्यात आले होते. मात्र, मोबाइलचा वापर करता येत नसल्यामुळे ते करता आले नाहीत.
-महारुद्र वाघ, खडकी घाट
..
ई-पीक पाहणी नोंद ही एक प्रकारचे नाटक आहे. पाऊस झाल्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून, नुकसानभरपाई देण्याऐवजी शासनाकडून ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याची भावना आहे.
-संजय शिंदे, नेकनूर
...
प्रशासनाकडे माहितीच उपलब्ध नाही
ई-पीक पाहणी ॲपवरून नुकसानीचे फोटो किंवा माहिती अपलोड करणे क्लिष्ट बाब आहे, असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. ज्यांना यासंदर्भात माहिती आहे अशा शेतकऱ्यांनी माहिती अपलोडदेखील केली आहे. मात्र, याचा डाटाच जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, सर्व्हर डाऊन असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.