बीड : जिल्ह्यात अतिरिक्त ऊस झाला आहे. अतिरिक्त ऊस न गेल्याने २००७ मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून कारखान्यांनी खबरदारी घ्यावी. यापुढे जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्ह्याबाहेरील ऊस आणल्यास ती वाहने रस्त्यातच अडविण्याचा इशारा देत शेतकऱ्यांनी देखील सज्ज राहण्याचे आवाहन शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी दिला.
वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ऊस परिषद घेण्यात आली. यावेळी भाई थावरे बोलत होते. परिषदेस सोमनाथ बडे, सेवा सोसायटीचे चेअरमन शमशेर भाई, मयूर बडे तसेच सोन्नाखोटा, चिंचोटी, पिंपळटक्का, पिंपळा, रुई, चिंचवण, कोटरबन, खळवट लिमगाव, दहिफळचे शेतकरी उपस्थित होते.
थावरे म्हणाले की, उसाला ३ हजार ९०० रूपये एफआरपी मिळाला तरच शेतकऱ्यांना ऊस परवडतो. मात्र ऊसाला अपेक्षित एफ आरपी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. गतवर्षी जिल्ह्याबाहेरील नॅशचर शुगरने ऊसाला २४०० तर गंगाखेड शुगरने २२६७ रुपये भाव दिला. मग जिल्ह्यातील कारखान्यांना असा भाव देणे का परवडत नाही, असा सवाल त्यांनी केला. उसाला कमीत कमी भाव देऊन आपल्याच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याला कसे भरडता येईल याकडे साखर कारखानदारांचे विशेष लक्ष असल्याची टीका त्यांनी केली. कारखाना प्रशासन, ठेकेदार, शेतकी अधिकाऱ्यांच्या संगनमताने गतवर्षी अतिरिक्त ऊसासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजाराप्रमाणे आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला. कारखानदार बैठक घेऊन ऊसाला भाव ठरवतात, मग शेतकऱ्यांनी आपल्याला काय भाव पाहिजे यासाठी एकत्र यावे असे आवाहन थावरे यांनी केले.
दरम्यान ऊस परिषदेत ऊसाला एक रकमी रक्कम द्यावी, बाहेरील जिल्ह्यातील ऊस जिल्ह्यातील कारखान्यांनी आणू नये, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस दर द्यावा, ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या इन्ट्रीवर नियंत्रण असावे आदी ठराव घेण्यात आले. यावेळी बालासाहेब बडे, ईश्वर तांबडे, माजी सरपंच शेख अलताफ , शेख आबेद, इंद्रसेन कोटूळे, शेख बाबूभाई, दत्तू तुरे, रामकिसन तुरे, विष्णू डोंगरे, धनंजय माने, महादेव महाराज खोटे, शिवाजी मुंडे, राजेंद्र घुले आदी उपस्थित होते
210921\21_2_bed_14_21092021_14.jpeg
शेतकरी ऊस परिषद थावरे