बीड : वय ४० वर्षे.. चारही वेळेस सिझरच.. पाचव्यांदा गर्भवती.. प्रकृती अतिशय गंभीर.. या कठीन परिस्थितीवर मात करीत बीड जिल्हा रूग्णालयात पाचव्यांदा यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचे सिझर करण्यात आले. सध्या बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत. बीडमध्ये हे प्रथमच झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात आणि त्यांच्या टिमने ही शस्त्रक्रिया केली.
नाझमीन मिनाज कादरी (४० रा.चकलांबा ता.गेवराई) असे या मातेचे नाव आहे. नाझमीन यांचे यापुर्वी चारवेळा सिझर झालेले असल्याने पोटात गुंतागुंत होती. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करता आली नव्हती. त्यानंतर ही महिला पाचव्यांदा गर्भवती राहिली. औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालात ती वैद्यकीय गर्भपातासाठी गेली होती, परंतु गुंतागुंत होण्याची शक्यता असल्याने तिचा वैद्यकीय गर्भपात होऊ शकला नाही. रविवारी सायं ५ वाजता चकलांबा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल मुळे यांनी संबंधीत महिलेची तपासणी केली.
प्रकृती पाहून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांना कळवले. डॉ. कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना याबाबत माहिती दिली. डॉ. थोरात यांनी तात्काळ संबंधित महिलेस बीड येथे घेऊन येण्यास सांगितले. त्या महिलेस बीडमध्ये सिझर होणार नाही, असे सांगितल्याने ते सोमवारी औरंगाबाद येथे जाणार असल्याचे सांगितले. परंतु वेळीच त्यांचे समुपदेशन करून त्यांना जिल्हा रूग्णालयात आणले आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली.
तत्परता आणि यशप्रकृतीचे गांभीर्य ओळखून डॉ.थोरात व डॉ. कदम यांनी विष्णू खेडकर यांना तात्काळ शासकीय रूग्णवाहिका घेऊन चकलांब्याला पाठविले. तेथील आशा बबिता आंधळे व नीता खेडकर यांनी त्या महिलेचे समुपदेशन केले आणि तिला जिल्हा रुग्णालयात आणले. येथे तिचे सिझर आणि कुटूंबकल्याण या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. तत्परता दाखविल्याने यश मिळाल्याचे दिसले.
या टिमने घेतले परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.संजय कदम, डॉ.माजेद शेख, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. सदाशिव राऊत, डॉ. परमेश्वर डोंगरे, भूलतज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ.अर्जुन तांदळे, डॉ. अविनाश ठोंबरे,बालरोगतज्ञ डॉ. कौशल्या शिंदे, मोमीन जफर, महेंद्र भिसे, संदीप बामणे या टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
अशा शस्त्रक्रिया क्वचितच पाचव्यांदा सिझरचे प्रमाण अत्यल्प असून गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे अशा शस्त्रक्रिया फक्त वैद्यकीय महाविद्यालयात व त्या सुद्धा क्वचितच होतात. बीड जिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. परंतु आम्ही ती यशस्वी केली. याचे श्रेय सर्व टिमला आहे.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड