बीड : आपला जिल्हा हा मागास, ऊसतोड कामगारांचा व गरीब जिल्हा आहे. अशा जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये दारू व्यसनावर खर्च होतात. संसार उद्ध्वस्त होऊ नयेत, याकरिता व्यसनमुक्तीचा हा लढा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे आ. विनायक मेटे यांनी सांगितले. मराठवाडा लोकविकास मंच मुंबई, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन आणि कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत व्यसनमुक्तीवर आधारित कार्यक्रमात ते बोलत होते.
ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन ३१ डिसेंबर रोजी बीड नगरीत आ. विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाले.
यावेळी मेटे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात मराठवाड्यात आणि महाराष्ट्रत आपण व्यसनमुक्तीवर काम करीत आहोत. नवतरुण या व्यसनाकडे सुरुवातीला आकर्षित होण्यासाठी ३१ डिसेंबर या दिवशी नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली या व्यसनाच्या बळी पडतात आणि हळूहळू ते व्यसनाधीन होतात. त्यामुळे आपण आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेण्याचा निश्चय केला आहे, असे ते म्हणाले.
दरवर्षी आ. विनायक मेटे यांच्या पुढाकाराने बीडमध्ये ३१ डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करत समाजप्रबोधनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे व्यसनमुक्तीवर आधारित कीर्तनाचा कार्यक्रम कोविड १९ च्या नियमांचे पालन करीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सर्व समाजातील धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सर्व समाजातील धर्मगुरूंनी समाजातील सर्व तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याची विनंती केली.
गेल्या अनेक वर्षांपासून आ. विनायक मेटे हे व्यसनमुक्तीसाठी काम करीत आहेत. त्यांच्या बऱ्याच कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो आहे. आज या व्यसनमुक्तीवर आधारित कीर्तनाच्या माध्यमातून एक जरी व्यक्ती व्यसनमुक्त झाला तरी आ. मेटे यांच्या कामाचे चीज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि व्यसनमुक्त झालेल्या परिवाराचे आशीर्वाद आ. मेटे यांना लाभल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार इंदुरीकर महाराज यांनी काढले.
कार्यक्रमास माजी आ. राजेंद्र जगताप, श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील महादेव महाराज, मुस्लिम समाज धर्मगुरू मौलाना जाकिर, मारेफउल्ला खान, मौलाना अब्दुल्ला, ख्रिश्चन समाज धर्मगुरू चार्ल्स सोनवणे, संजय गायकवाड, बौद्ध धर्मगुरू भंते पय्यातीस महाथेरो, शिरसाळा, अशोक हिंगे आदि उपस्थित होते. यावेळी धर्मगुरूंनी आपले मनोगत व्यक्त केले.