- पुरूषोत्तम करवा
माजलगाव: माजलगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आपल्या मुलाबाळांसह तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांचे कुटुंब सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याने आता विविध मागण्यांसाठी सुरु असलेला हा लढा आता आणखी तीव्र झाल्याचे दिसत आहे.
विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे. या संपाचा भाग म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता आगारातून आपल्या पत्नी , पती व मुलांसह भव्य मोर्चा काढला. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांचा डोक्यावर टोप्या होत्या. या टोप्यावर 'लढा विलीनीकरणाचा' असे लिहिलेले होते.
यावेळी कर्मचाऱ्यांचे चिमुकले सुद्धा सहभागी होते. तेही मागण्यांसाठी घोषणा देतांना दिसून येत होते. या घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहर दणाणून गेले. या मोर्चाला विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा दोन तासानंतर तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.