- नितीन कांबळे
कडा (बीड) : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आता समाज आक्रमक होताना दिसत आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्याने ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ हातोला येथे १७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. आज, शुक्रवारी सकाळी हातोल्यासह परिसरातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत आष्टी तालुक्यातील हातोला फाटा येथे एक तास बीड-नगर राज्य महामार्ग रोखला.
जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री येथे हक्काचे ओबीस आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे. अद्याप देखील राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण होत नसल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. तर आष्टी तालुक्यातील हातोला येथे १७ जून पासून परिसरातील ग्रामस्थ गावच्या मंदिरात उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा आज चौथा दिवस असून देखील याचीही प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याने हातोल्यासह परिसरातील महिलांनी एकत्र येत बीड-नगर राज्य महामार्गावरील हातोला फाटा येथे रस्तारोको आंदोलन केले. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या रस्तारोकोत शेकडो महिलांचा सहभाग होता. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अंमळनेर पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला.