गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील तलवाडा येथे प्रसिद्ध त्वरिता देवीचा पुजारी नेमण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. ही घटना ३० जून रोजी घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरून १६ जणांवर तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दीपक भक्तिदास रायते (२३, रा.अंबिकानगर, तलवाडा) यांच्या फिर्यादीनुसार, पुजाऱ्याचे यंदाचे वर्ष आमच्याकडे असून, न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र आहे, असे सांगत असताना, त्यांना तुमचे प्रमाणपत्र खोटे आहे, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्याने व चापटाने मारहाण केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रवी रायते, विठ्ठल रायते, देवीदास रायते, अशोक रायते, शुभम रायते, संगीता रायते, गंगा रायते, शिवकन्या रायते, सागर रायते (सर्व रा.तलवाडा), अमोल गुरव, तुषार गुरव व कृष्णा गुरव (सर्व रा.गोंदी, ता. अंबड, जि.जालना) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसऱ्या गटाकडून रवींद्र अशोक रायते यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, शशिकला रायते जिवंत असताना त्यांचे वारस प्रमाणपत्र कसे काय काढले, असे म्हणल्याने त्यांना मारहाण केली. भक्तिदास यमुना रायते, दीपक भक्तिदास रायते, पल्लवी भक्तिदास रायते यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.