लोकमत न्यूज नेटवर्क
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शनिवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेवेळी गावातील विकासकामांवरून सदस्यांत गदारोळ झाला. यावेळी दोन गटांत बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात चार जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण असून, येथे बीड येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे.
दिंद्रुड ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी अरुण पोटभरे व सरपंच अजय कोमटवार यांनी मासिक सभेचे आयोजन केले होते. यावेळी गावातील विकासकामांवरून व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरून विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावरून दोन्ही गटांत बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही गटांतील सदस्यांनी मोबाईलवर संपर्क साधून कार्यकर्ते बोलावले. यावेळी येथे दोन्ही गटांतील लोकांचा मोठा जमाव ग्रामपंचायतीसमोर जमा झाला. यावेळी दोन गटांत वाद सुरू झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हाणामारीत लाठ्याकाठ्यांचा वापर झाला. यात चारजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती दिंद्रुड पोलिसांना मिळताच दिंद्रुड पोलीस ग्रामपंचायतीसमोर तत्काळ दाखल झाले. सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, फौजदार विठ्ठल शिंदे यांनी जमाव पांगविला. दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी उशिरापर्यंत चालू होती. दरम्यान, या घटनेत कोण जखमी झाले याची माहितीही मिळू शकली नाही. दंगल नियंत्रण पथकाने माजलगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून फेरी काढून शांतता राखण्याचे आवाहन केले.
...
घटना सीसीटीव्हीत कैद
माजलगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश पाटील यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. दिंद्रुड येथे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेवेळी झालेल्या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी अरुण पोटभरे सभेस हजर होते. घटना घडताच पोटभरे यांनी पळ काढला. त्यांच्याशी अनेकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नॉटरिचेबल होते.
....
...
310721\img_20210731_184111_14.jpg
दिंद्रुड येथे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्यावेळी झालेला हाणामारीने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावात दंगल नियंोण पथक संचलन करताना.