परळी (जि. बीड) : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात झालेल्या मृद संधारण कामात २ कोटी ४१ लाख ६३६ रूपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून बीड जिल्ह्यातील १३८ मजूर सहकारी संस्थांविरूध्द परळी शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच परळी व अंबाजोगाई कृषी कार्यालयाच्या २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.कृषी अधिकारी व मजूर सहकारी संस्था (कंत्राटदार) यांनी संगनमत करून कृषी कार्यालयामार्फत कामे झाल्याचे दाखवून तसेच बोगस कामे करून २ कोटी ४१ लाख ६३६ रूपयांचा अपहार केल्याची फिर्याद तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर १३८ मजूर सहकारी संस्थांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये आष्टी, पाटोदा, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, धारूर तालुक्यातील मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.
परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंंतर्गत विविध कामे मंजूर झाली होती. त्यापैकी काही कामांत गैरव्यवहार तर काही कामे न करता पैसे उचलले, अशी तक्रार येथील काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात केली होती. त्यानंतर विशेष चौकशी पथकाने परळी तालुक्यात येऊन तक्रारीची शहानिशा केली. या पथकाच्या पाहणीत कामे न करता बोगस बिले उचलल्याचे निदर्शनास आले. त्यावरून यापूर्वी परळी व अंबाजोगाई कृषी कार्यालयाच्या २४ अधिकारी व कर्मचाºयांविरूध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.कृषी अधिकाºयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी १३८ मजूर संस्था व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपींची संख्या आताच सांगता येणार नाही, असे पोलीस निरीक्षक शेळके यांनी सांगितले. दरम्यान गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून चार दिवसांपासून प्रशासनातील अधिकाºयांवर राजकीय दबाव होता, असे सूत्रांनी सांगितले.