माजलगाव (बीड ) : ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्या विरोधात अतिक्रमण करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून आज अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके या पुढील तपास करत आहेत.
शहरापासुन जवळच असलेल्या खानापुर येथे बाळासाहेब पौळ यांचे घर आहे. त्यांच्या समोरील भागात ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांचे हॉस्पिटल आणि घर आहे. पौळ यांच्या फिर्यादीनुसार, १४ डिसेंम्बर २०१७ पासून १५ जानेवारी २०१८ या कालावधीत साबळे यांनी त्यांचे राहते घर विक्री करावे या उद्देशाने वेळोवेळी अत्याचार केले. खानापूर भागात तेरा व चौदा नंबरचे प्लॉट त्यांच्या मालकीचे आहेत. त्यापैकी १३ न. प्लॉटवर डॉ. साबळे याने अतिक्रमण केले होते. पौळ हे आपणास प्लॉट विक्री करत नसल्याने डॉ. साबळे त्यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय कचरा, शस्त्रक्रियेनंतरची घाण, खराब पाणी अतिक्रमण केलेल्या प्लॉट मध्ये टाकत. याविषयी पौळ यांनी डॉ. साबळे यांना विचारणा केली त्यांनी गुंडांना सोबत घेऊन घरात घुसून लाथा बुक्याने मारहाण केली. यासोबतच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली
यावरून पौळ यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही डॉ. साबळेवर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे पौळ यांनी न्यायालयात धाव घेतली. यानुसार अप्पर सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.१५) डॉ. साबळे यांच्या विरुद्ध भादवी कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ चे कलम ३(२)(४)(५)(१०)(१५) भाद्विचे कलम ४५२,३२३,५०४,५०६, न्यायालय आदेशाने १५६(३)सी आर पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार आज शहर पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके या करत आहेत.