माजलगाव :
येथील नगर परिषदेच्या आरक्षित जागेवर आठवडी बाजार भरवून बेघर लोकांना प्लॉट वाटप करण्याची मागणी करण्यात आली. माजलगाव येथील नगरपालिकेच्या आरक्षित सर्व्हे नं. ३७९, ३७२, ३७३ मधील जागेचा नगरपालिकेने ताबा घेऊन या ठिकाणी बेघर- भोगवटादार यांना घरे बांधण्यासाठी जागा द्यावी, अशा मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने २ जून रोजी या जागेवर ताबा आंदोलन करण्याचे निवेदन बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलिम यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
दि. २० रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या आरक्षित जागा सर्व्हे नं. ३७९, ३७२, ३७३ हे असून ती जागा नगर परिषदेने ताब्यात घेऊन भोगवटदार व बेघर नागरिकांना प्लॉट पाडून वाटप करावे या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे २२ एप्रिल रोजीचे आपणास पत्र दिले आहे. मात्र, आपल्या कार्यालयाने आजपर्यंत या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसून आपला हेतू गरीब व बेघर कुटुंबांना घरे न मिळण्याच्या हेतूने आपण जागा ताब्यात घेण्यास दुर्लक्षित करत असल्यामुळे या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले व करत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. अतिक्रमण काढून वरील जागा खुली करण्यात यावी व यातील काही शिल्लक जागा आठवडी बाजारास कायमस्वरुपी द्यावी, अन्यथा लोकतांत्रिक जनता दल पक्षाच्या वतीने २ जून रोजी या जागेवर ताबा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार व सर्व संबंधितांना देण्यात आले आहे.