लोकमत न्यूज नेटवर्क
केज : दरोड्यासह विविध गुन्ह्यांत तीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस केज पोलिसांनी केज शहरातील क्रांतीनगर भागात शुक्रवारी (१३ ऑगस्ट) रोजी रात्री फिल्मी स्टाइलने पाठलाग करून पकडून जेरबंद केले.
केज तालुक्यातील पिंपळगाव येथील उत्तम शिवराम शिंदे याच्यावर केज पोलीस ठाण्यात १९९१ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. तेव्हापासून तो आजतागायत तीस वर्षे फरारी राहून पोलिसांना चकवा देत होता. तो फरारी असताना २०२० मध्ये पुन्हा त्याच्यावर चोरांच्या टोळीत सक्रिय असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तम शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याने तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता.
उत्तम शिंदे हा केज येथील क्रांतीनगर भागात शुक्रवारी आल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेच्या पथकाचे पोलीस नाईक दिलीप गित्ते यांना मिळाली. मात्र, गुन्हेगार हा चाणाक्ष असून, तो हातातून निसटून जाऊ नये म्हणून पूर्ण गुप्तता पाळून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी सर्व फिल्डिंग लावली. त्याला गाफील असताना रात्री जेरबंद करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. रात्री अचानक पोलिसांनी त्याला घेरले. तरीही उत्तम शिंदे पळून जाऊ लागला; परंतु पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहायक फौजदार महादेव गुजर, दिलीप गित्ते, अशोक नामदास, शेख मतीन, अशोक गवळी यांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.
140821\206-img-20210814-wa0029.jpg
दरोड्यासाह विविध गुन्ह्यात तीस वर्षांपासून फरार असलेला आरोपी उत्तम शिंदे यास केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, डीबीचे दिलीप गित्ते, अशोक नामदास, शेख मतीन, अशोक गवळी यांनी त्यास जेरबंद केले