लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमधील (बिगर अल्पसंख्यांक संस्था) अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया प्रशासकीय कारणांमुळे शुक्रवारी झाली नव्हती. अखेर या शिक्षकांचे समायोजन ९ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून करण्यात येणार आहे.खाजगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासनाच्या निर्देशानंतर कार्यवाही सुरु झाली. माध्यमिक विभागात विविध शिक्षण संस्थांमधील ७९ तर प्राथमिक विभागात १२ शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती पुढे आल्यानंतर ४ व ५ डिसेंबर रोजी आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या.अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित संस्था व शिक्षकांच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आले होते. ६ रोजी अंतीम यादी डकविण्यात येणार होती. मात्र ७ रोजी होणारी समायोजन प्रक्रिया प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.माध्यमिक विभागात आलेल्या आक्षेपांवर विचाराअंती ७४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. प्राथमिक विभागात प्राथमिक विभागातील ४२ रिक्त जागांवर अतिरिक्त १२ शिक्षकांचे समुपदेशनाने समायोजन केले जाणार आहे. ८ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात आली.९ डिसेंबर रोजी रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेत समुपदेशन पध्दतीने समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.या वेळी अतिरिक्त शिक्षक व अतिरिक्त शिक्षक असलेल्या मुख्याध्यापकांनी तसेच रिक्त पदे असलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिका-यांना याबाबत कळविण्यात आले आहे.
अखेर ८६ अतिरिक्त खाजगी शिक्षकांचे आज समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:24 AM