परळी : तालुक्यातील भोपळा येथील तलावात पोहताना बुडालेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आज, २० जून रोजी सकाळी आठच्या सुमारास तलावात सापडला. गणेश माणिकराव फड ( २२) असे मृत युवकाचे नाव आहे. परळी नगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाच्या पथकाच्या शोध मोहिमे दरम्यान मृतदेह आढळून आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणी करण्यात आली. दरम्यान, दुपारी कन्हेरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील गणेश माणिकराव फड हा पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुटीमुळे तो कन्हेरवाडी येथे आपल्या गावी आला होता. दोन-चार दिवसांनी पुण्याला परत जाणार होता. दरम्यान, बुधवारी, १९ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गणेश मित्रासोबत भोपळा येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना अचानक तो बुडाला.
याची माहिती मिळताच पालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर गणेशचा तलावात शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी ७ वाजता पुन्हा तलावात नप कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली. अखेर आठ वाजेच्या सुमारास गणेशचा मृतदेह आढळून आला. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कन्हेरवाडी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेशच्या पश्यात आई, वडील, एक लहान भाऊ आहे.
तलावात पोहणे टाळावे भोपळा तलावात पाणी भरपूर आहे त्याची खोली समजून येत नाही. पोहता न येणाऱ्या व अर्धवट पोहता येणाऱ्यांनी भोपळा तलावात पोहण्यास जाण्याचे टाळावे असे आवाहन परळी चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.