लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड बसस्थानकातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून आवाज उठविला होता. याचीच गंभीर दखल घेऊन सोमवारी बीड बसस्थानकात ९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे अनुचित प्रकार, चो-यांना आळा बसणार आहे. कॅमेरे बसविल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बीड बसस्थानकात रोज शेकडे बसगाड्यांची ये-जा असते तर हजारो प्रवाशी चढ-उतार करतात. प्रवाशांची गर्दी पाहता याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केलेले नव्हत्या. पोलीस प्रशासनाकडून दोन कर्मचारी बंदोबस्तावर होते तर खाजगी दोन-चार सुरक्षा रक्षक असायचे. या सर्वांची नजर चुकवून चोरटे प्रवाशांचे खिसे कापायचे, बॅग लंपास करायचे, दागिन न्यायचे.
यामुळे बीड बसस्थानकात येणाºया प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण होते. तसेच स्थानकात महिला व मुलींची छेडछाडही वाढली होती. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन लोकमतने वृत्त प्रकाशित केले. त्याचा पाठपुरावाही केला. याच वृत्तांची दखल घेऊन जनाधार प्रतिष्ठानने अनुप मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार आवाज उठविला. याची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाने सोमवारी बसस्थानकात सर्वत्र ९ ठिकाणी कॅमेरे बसविले.
या कॅमे-यांच्या निगराणीखाली संपूर्ण बसस्थानक असणार आहे. यावर स्थानक प्रमुख संतोष महाजन हे नजर ठेवतील. प्रभारी आगारप्रमुख एस.एच.कराड यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता.
मोबाईलमधून ठेवणार वॉचसध्या स्थानक प्रमुख महाजन यांच्या कक्षातून यावर नियंत्रण राहिल. परंतु काही दिवसानंतर आगारप्रमुख आणि विभागीय नियंत्रक यांच्या मोबाईलमध्ये सर्व चित्रीकरण दिसेल, याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच तीन महिन्यापर्यंत याचे बॅकअप राहणार आहे, असे आगारप्रमुख एस.एच.कराड म्हणाले.