माजलगाव मतदारसंघात दिंद्रूडजवळ असलेल्या
फकीरजवळा, हिंगणी, संगम, चिखली, व्हरकटवाडी, सिंघनवाडी, देवदहीफळ, कचारवाडी, मोहखेड अशा तब्बल १८ गावांतील शेतकरी जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झाले. त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३३ टक्के अनुदान जाहीर केले व तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांनी प्रत्येक बँकेस रक्कम पाठवली. मात्र, बँक अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे तब्बल एक महिना उलटून गेला तरी वाटपच केले नाही म्हणून शेतकरी दररोज या शाखेत चकरा मारत होते; परंतु त्यांना परत पाठवले जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता सिंघल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सिंघल यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण सोपवले होते. त्याची दखल प्रशासनाने घेत उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व तहसीलदार वैशाली पाटील यांनी ग्रामीण बँकेच्या शाखेस भेट दिली व शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटपाच्या सूचना दिल्या. त्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी १८ गावांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपडेट करून नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून वाटप सुरू करण्यात आले आहे.