बीडःबीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांना हैराण केलेला अन्न औषध प्रशासन विभागाचा सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे लाचेच्या जाळयात अडकला. गुरुवारी सकाळी त्याला ३५ हजाराची लाच घेताना एसीबीने बीड येथील कार्यालयात पकडले. त्याच्यासोबत एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दाभाडे याच्याबद्दल जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मोठ्या तक्रारी होत्या. अन्न परवाना नूतनीकरणासाठी एका झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्याने एसीबीकडे तक्रार केली होती. यावरून गुरुवारी सकाळी एसीबीचे बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने एफडीएच्या बीड येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळी स्वतःच्या कार्यालयातच एका दलालाच्या माध्यमातून ३५ हजाराची लाच घेताना कृष्णा दाभाडेला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाई नंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
शहरातील गुटखा व्यापाऱ्याशी संबंधबेकारी, अन्न प्रक्रिया केंद्र अशा ठिकाणी स्वतः जाऊन दाभाडे लाचेची मागणी करत असत अशी माहिती आहे. यासोबतच बीड येथील एका कुप्रसिद्ध गुटखा व्यापाऱ्यासोबत त्याचे अनेक दिवसांपासून संबंध असल्याची चर्चा शहरात आहे. या कारवाईने दाभाडे यांच्या लाचेची अनेक किस्से शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आता चर्चेली जात आहेत.