गेवराई : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील गुन्ह्यात फरार असलेले कोळगाव येथील हनुमान महाराज गिरी यांना आज सकाळी पोलिसांनी सूर्यमंदीर संस्थान परिसरातून ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या महाराजांनी आत्महत्येचा इशारा देऊन पोलीस प्रशासनाची झोप उडविली होती.
सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. माझ्या मृत्यूला गावातील काही राजकारणी, पत्रकार, 'त्या' मुलीचे कुटूंब जबाबदार आहे. अवघ्या पाच मिनिटात मी गळफास लावणार असल्याचा व्हिडीओ व्हायरल करून हनुमान महाराज पसार झाले. मात्र, पोलीस सातत्याने त्यांच्या मागावर होते.
दरम्यान, महारांजाच्या नातेवाईकांकडून हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी मिळाली. बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिना अर्ज फेटाळला. त्यामुळे गिरी महाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र, हनुमान महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. खंडपीठानेही 21 ऑगस्ट रोजी त्यांचा जामिन अर्ज फेटाळला. सूर्य मंदिर परिसरातून हनुमान महाराज गिरी यांना आज सकाळी अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिली.