माजलगाव (जि. बीड) : सतत तीन महिने पालिकेत गैरहजर राहिल्याच्या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त झाल्याची घोषणा केली. २८ जून रोजीच्या आदेशानुसार त्यांनी हे जाहीर केले. यामुळे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना जबर हादरा बसला आहे.
सहाल चाऊस हे २०१६ मध्ये जनतेतून निवडून आले होते. मागील तीन महिन्यांपासून म्हणजेच १७ मार्चपासून भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे नगर परिषद नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६ (३) नुसार सदर पद रिक्त करण्याबाबत तसेच पदभार हस्तांतरीत न केल्याबाबत दाखल अर्जावर हा निर्णय बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मागील चार महिन्यांपासून माजलगाव नगर परिषद ही आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चांगलीच गाजली असून या प्रकरणात येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना जबाबदार धरुन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मार्चपासून चाऊस हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तेव्हापासून अध्यक्षपदाचा पदभार हा कोणालाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील तीन महिन्यांचा लॉकडाऊन तसेच इतर कार्यालयीन कामांवर मोठा प्रभाव पडत होता. जनता त्रस्त झालेली आहे. २७ मे रोजी अध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला होता; मात्र, न्यायालयाच्या आदेशाने हा प्रयत्न असफल झाला होता.
मात्र, प्रस्तुत प्रकरणाने पुन्हा कलाटणी घेतली व नगर परिषद नगर पंचायत अधिनियम कलमानुसार सतत तीन महिने परवानगी न घेता गैरहजर असल्याचे दाखवून कार्यवाही प्रस्तावित करण्यात येऊन त्यात अध्यक्षपदाचा पदभार देण्याबाबतची मागणी नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी हा निकाल दिला. नगर परिषद बरखास्तीची देखील मागणी आ. प्रकाश सोळंके यांनी केली आहे.