बीड : मुंबईवरून बोलत असल्याचे सांगून बॅंक खात्यासंदर्भात माहिती विचारून घेत, एका सेवनिवृत्त अधिकारी ७९ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर दि. २६ मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश सखारामपंत कुलकर्णी (रा. द्वारकानगरी शिंदे नगर बीड ) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून, पॅन नंबर विचारून घेतला. त्यानंतर त्यांच्या बीड सयोगनगर भागातील बॅंकेच्या शाखेतून तीन हजार रुपये, त्यानंतर शिवाजीनगर बॅंकेच्या शाखेतून ५३ हजार रुपये व अंबाजोगाई येेथील बॅंक शाखेतून २३ हजार रुपये असे सर्व मिळून ७९ हजार रुपये काढून घेतले होते.
ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बॅंकेत धाव घेतली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यानंतर बॅंकेचा सल्ला घेऊन फोन क्रमांकावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे करत आहेत. याप्रकरणाचा तपास सायबर विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती साईनाथ ठोंबरे यांनी दिली.
ऑनलाइन फसवणूक वाढली
फोन पे, गुगल पे व बॅंक खाते यासंदर्भात माहिती विचारून घेत त्यामाध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे बॅंक खात्यासंदर्भात कोणालाही माहिती देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.