लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरात लाॅकडाऊन सुरू असताना व या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवायच्या असताना येथील आंबेडकर चौकातील एक खानावळ सुरू असल्याने नगरपालिकेने संबंधित खानावळ चालकाला पाच हजारांचा दंड केला.
महाराष्ट्र शासनाने दोन दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शहरात मंगळवारी पोलिसांनी नवीन बसस्थानकासमोरील गायत्री हाॅटेल व बायपास रोडवरील साई हाॅटेलचे मालक यांना ग्राहक करत असताना रंगेहात पकडले होते. या दोन्ही हाॅटेल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचबरोबर बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौकातील मन्नत खानावळ खुलेआम सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी त्याठिकाणी जाऊन संबंधित खानावळीचे चालक शहानवाज रशीद कुरेशी यांना पाच हजार रुपयांचा दंड केला. या खानावळ चालकाला केलेल्या दंडामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, माजलगाव शहर व परिसरात परवानगी नसतानाही अनेक हाॅटेल व दुकाने चोरून व काही ठिकाणी खुलेआम उघडी असल्याचे दिसून येत होते.