परळी (बीड ) : बंद असलेल्या परळी-पिंपळा धायगुडा रस्त्याचे काम सुरु करावे या मागणीसाठी परळी-अंबाजोगाई रस्त्यावर नागरिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलकांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी- पिंपळा हा 18 किमी अंतराचा सिमेंट करण्याचा रस्ता गेल्या 16 महिन्यापासुन रखडुन पडला आहे. या मार्गावर दोन्ही बाजुने रस्ता खोदुन ठेवला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातच सुनिल हायटेक कंपनी हे काम अर्धवट सोडून गेली आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी १० मार्च, रविवारी शंकर पार्वती नगरजवळ सकाळी 9.40 ते दुपारी 3 पर्यंत रस्तारोको आंदोलन केले.
आंदोलकांनी मा.जिल्हाधिकारी दंडाधिकारी बीड यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन अनधिकृतपणे रस्तारोको आंदोलन केले. वाहतूक थांबवून रहदारीस अडथळा निर्माण केला, अशी तक्रार पोलिस नाईक समाधान भाजीभाकरे यांनी दिली. यावरून शहर पोलिस ठाण्यात शंकर कापसे, अतुल दुबे, रवी आघाव, धनंजय फुलारी, प्रणव परळीकर, नारायण फुलारी, बालाजी सातपुते व इतर 70 ते 80 महिलापुरुष आंदोलकांविरोधात सोमवारी (दि. ११ ) तक्रार दाखल करण्यात आली. आम्ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन केले, मात्र आमच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. पुढील पोलिस नाईक कमलाकर सिरसाट हे करीत आहेत.