बीड : येथील जिल्हा रूग्णालयातील रेकॉर्ड रूमला बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास आग लागली. यामध्ये महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. जिल्हा रूग्णालयात आस्थापना विभागाची तीन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर स्वयंपाक घर, दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास यांचा कक्ष व सर्व आस्थापना विभाग व तिसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड रूम आहे. याच रेकॉर्ड रूमला रात्री साडे आठच्या सुमारास अचानक आग लागली. बाजूलाच असलेल्या पोलीस कॉलनी परिसरातील तरूणींनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड झाली. याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनासह अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर तात्काळ दोन बंब घटनास्थळी आले. जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली. याबद्दलची माहिती मिळताच अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, तहसीलदार अविनाश शिंगटे, डॉ.आय.व्ही. शिंदे, पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके रुग्णालय परिसरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत हे सर्व अधिकारी रूग्णालयात तळ ठोकून होते.
जिल्हा रूग्णालयाच्या रेकॉर्ड रूमला आग; कागदपत्रं खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:56 PM