बीड : जिल्हा रुग्णालयात आगीसंदर्भात एखादी दुर्दैवी घटना घडली तर आग नियंत्रणात आणण्यासाठी येथे २४ तास अग्निशमन विभागाची गाडी उभी करण्यात आली आहे, परंतु यासाठी मनुष्यबळच नाही. केवळ एक कर्मचारी असून तोदेखील अप्रशिक्षित असल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षितांचे वेतन न दिल्याने आज ही वेळ आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नाशिकमधील ऑक्सिजन सिलिंडर गळती, मुंबईतील कोविड केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीनंतर बीडचे जिल्हा प्रशासनही जागे झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच वॉर्ड क्रमांक २ मध्ये अचानक धूर निघाल्याने धावपळ उडाली होती. हा धूर ॲसिडचा असल्याचे समजल्यावर सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. परंतु यापुढे अशी काही दुर्घटना घडली तर उपाययोजना म्हणून रुग्णालयात २४ तास अग्निशमन बंब उभा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्याप्रमाणे सध्या येथे गाडी उभी आहे. परंतु केवळ एकच कर्मचारी येथे शिफ्टमध्ये काम करतो. जो कर्मचारी आहे, तोदेखील अप्रशिक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे असे अप्रशिक्षित कर्मचारी कशी आग नियंत्रणात आणणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशिक्षित २९ कर्मचाऱ्यांचा राजीनामा
बीड पालिकेच्या अग्निशमन विभागात एका एजन्सीला कंत्राट देऊन कर्मचारी भरती केले होते. परंतु त्यांचे वेतनच न मिळाल्याने हे सर्व २९ प्रशिक्षित कर्मचारी राजीनामा देऊन गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचे वेतन अदा करून परत बोलावल्यास दुर्घटना नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे. परंतु जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका यांच्या ढिसाळ कारभारामुळे कर्मचारी तर उपाशी आहेतच, शिवाय सामान्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. वेतन देण्याची मागणी होत आहे.
रुग्णालयात बसविली ९५ अग्निरोधक यंत्रे
जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारानंतर तत्काळ परभणीच्या कंत्राटदाराला सूचना करीत अग्निरोधक यंत्रे मागविण्यात आली. दिवसभरात ९५ यंत्रे बसविल्याची माहिती आहे.
...
जिल्हा रुग्णालयात ३ हजार लीटर पाणी क्षमता असलेली गाडी २४ तास उभी आहे. केवळ १२ कर्मचारी असून शिफ्टनिहाय एक कर्मचारी तेथे असेल. काही घटना घडल्यास तत्काळ तो कॉल देईल. प्रशिक्षित कर्मचारी सोडून गेले असून सध्याचे कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. हा मुद्दा वरिष्ठांना सांगितलेला आहे.
- बी.ए. धायतडक, प्रमुख अग्निशमन विभाग, बीड
===Photopath===
260421\26_2_bed_16_26042021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात सोमवारी अग्निरोधक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते.