वडवणी ( बीड ) : शहरातील बालाजी फर्निचर या दुकानाला आज चार वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. शहरात केवळ अग्निशमन गाडी असून कर्मचारीच नसल्याने आगीत दोन मजली दुकानाची राख होताना नागरिक आणि दुकान मालक हतबलतेने पाहत होते. या आगीत फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुख्य रस्त्यावरील विजय मायकर यांच्या मालकीचे बालाजी फर्निचर हे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी दुकानाला मोठ्या उत्साहात सुरुवात केली होती. दुकानात खालच्या मजल्यावर फर्निचर तर वरच्या मजल्यावर इलेक्ट्रोनिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. क्षणार्धात आगीने वरचा मजला कवेत घेतला. आग पसरत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी खालच्या मजल्यावरील सामान बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, वरच्या मजल्यावरील फ्रीजला आग लागल्याने त्यातील गॅसचा स्फोट झाला. यामुळे आग झपाट्याने पसरली. एकाबाजूने दवाखाना तर दुसऱ्या बाजूने कपड्याचे दुकान असल्याने नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र, आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने नागरिकांचे प्रयत्न तोकडे पडत होते. त्यातच शहरात अग्निशमन दलच उपलब्ध नसल्याने नागरिक हतबल झाले. तब्बल दोन तास आगीचे तांडव सुरु होते. वेळीच आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण दुकानाची राख झाली.
अग्निशमन गाडी शोभेची वस्तू शहरात अग्निशमन गाडी असून येथे कर्मचारीच नाहीत. यामुळे अग्निशमन गाडी शोभेची वस्तू झाली आहे. आग विझविण्यासाठी सुविधाच उपलब्ध नसल्याने आज दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. शेवटी तेलगाव येथील सुंदरराव सोळुंके साखर कारखाना येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. एका बंबाने आग आटोक्यात येत नव्हती, यामुळे खाजगी टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. तब्बल दोन अडीज तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले.