लोकमत न्यूज नेटवर्ककेज : ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातील साखर कारखान्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या घरात उजेडासाठी लावलेली चिमणी खाली पडून आग लागली. यामध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर घरावरील पत्रे आगीने वितळून निकामी झाले. ही दुर्घटना केज तालुक्यातील डोका येथे शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.डोका येथील दत्तात्रय पांडुरंग भांगे हे दोन महिन्यापूर्वी उसतोडणीसाठी लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्याला गेले आहेत. डोका येथे त्यांच्या वृद्ध आईसह शाळेत शिकत असलेली मुले आहेत. सदरील ऊसतोड मजुराच्या घरी वीजपुरवठा नसल्याने शुक्रवारी रात्री भांगे यांच्या आईने रॉकेलची चिमणी लावली होती. अचानक चिमणी पडून त्यातील रॉकेल सांडल्याने पेट घेतल्याने कपड्यांना आग लागली. त्यांनी आरडाओरडा करून मदत मागितली. शेजारील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घरातील कपडे, अन्नधान्य, भांडे, घर खचार्साठी ठेवलेले दोन हजार रुपये जळून खाक झाले. आगीची झळ पत्र्याला बसल्याने पत्रेही वितळून निकामी झाले. या दुर्घटनेत भांगे यांचे अंदाजे ५० हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच गोरक भांगे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
ऊसतोड मजुराच्या घराला आग; संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:44 PM