परळी : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील बगॅसला बुधवारी दुपारी एकच्या दरम्यान आग लागली. या आगीत उसाचा भुसा जळाल्याने आगडोंब उसळला. त्यामुळे कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी घाबरून गेले. लागलीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.कारखान्यातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आगीचे स्वरुप पाहता परळी औष्णिक विद्युत केंद्र व अंबाजोगाई, माजलगाव, परळी इतर ठिकाणच्या अग्निशामक दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले.कारखान्यातील बगॅस विभागातील बेल्ट घासून घासून जळाल्याने आग लागल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. परन्तु आगीचे खरे कारण कळू शकले नाही.उन्हामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. कारखान्यातील ऊसाचे गाळप बंद होऊन आठ दिवस झाले होते.बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत भुसा खाक झाला. आगीत किती नुकसान झाले, हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकले नाही.
‘वैद्यनाथ’मधील बगॅसला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:29 AM