बीड : चहा, अल्पाेहारच्या हॉटेलला अचानक आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने गॅसच्या टाक्याजवळ आग पोहोचण्याआधीच अग्निशमन विभागाला ती विझविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील भाजी मंडईत घडली.
शहरातील भाजी मंडई हा परिसर कायम गर्दीने गजबजलेला असतो. गुरुवारी रात्रीही अशीच गर्दी असताना अचानक एका हॉटेलमधून धुराचे लोट येऊ लागले. हा प्रकार येणाऱ्या जाणाऱ्यांसह शेजारील लोकांनी पाहिला. तत्काळ याची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. विभागप्रमुख बी. ए. धायतडक हे पथक व बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यांनी पथकाने तत्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, याच हॉटेलमध्ये गॅसच्या टाक्याही होत्या. परंतु सुदैवाने तिथंपर्यंत आग पोहोचण्याआधीच ती विझविण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभागाचे पथक व नागरिक येथे गर्दी करून होते. या आगीत फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे कारण मात्र, उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.