बीड : मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे.
मराठा आरक्षणातील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने १३ जुलै पर्यंत वेळ मागितला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद साधत आहेत. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील भव्य शांतता रॅलीनंतर गुरुवारी बीडमध्ये ही रॅली होत आहे.
जिल्हाभरातून या रॅलीसाठी समाज बांधवांची गर्दी आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष रोड ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात मोठ्या प्रमाणात समाजबाधव उपस्थित आहेत. रॅलीत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांना अडचणीचा सामना करावा लागू नये. यासाठी विविध समूहांच्या माध्यमातून चहापाणी, फळे व अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 'जरांगे पाटलांचा बालेकिल्ला, बीड जिल्हा बीड जिल्हा' व 'छत्रपती शिवाजी कि जय' या घोषणेने शहर दणाणून गेले आहे.