बीड : जिल्हा रूग्णालयात चालू महिन्यात तीन माता मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच मंगळवारी सकाळी एका महिलेला वेळ संपली असे कारण सांगून शस्त्रक्रिया गृहातून बाहेर काढले. हा प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परंतू या निमित्ताने गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वडवणी तालुक्यातील एक महिला ८ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. अंगावरून लाल, पांढरे जाणे, पोट दुखणे आदी आजार होते. त्यामुळे या महिलेला गर्भपिशवी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व तपासण्याही केल्या. परंतू आज-उद्या करून १५ एप्रिलपर्यंत या महिलेच्या शस्त्रक्रियाला टोलवाटोलवी केली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता शस्त्रक्रिया गृहात नेले. परंतू १२ वाजेच्या सुमारास वेळ संपली असे सांगून या महिलेला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सिक आणि आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सीएस, एसीएस, आरएमओंची धावहा सर्व प्रकार नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय राऊत यांना सांगितला. त्यांनी तातडीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सदाशिव राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांना शस्त्रक्रिया गृहात पाठविले. आगोदर या महिलेची समुपदेशन केले. त्यानंतर स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.किरण शिंदे, डॉ.वाघमारे आदींना बोलावून घेत गर्भपिशवीची गंभीर शस्त्रक्रिया यशस्त्री केली. वरिष्ठांनी दखल घेतली खरी, परंतू नातेवाईकांनी प्रत्येकवेळी वरिष्ठांनाच सांगायचे? संबंधित डॉक्टर, कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिक बजावत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
दोन्ही राऊतांनी कठोर भूमिका घ्यावीसध्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.संजय राऊत तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सदाशिव राऊत आहेत. त्यांनी सेवेत हलगर्जी, टोलवाटोलवी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शोधून कान टोचण्याची गरज आहे. आपल्या स्वभावात बदल करून थोडी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. आपले कोणीच काही करू शकत नाही, अशा अविर्भावात असणाऱ्यांना कारवाईचा दणका तर चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर माता मृत्यू आणि रूग्णसेवेत हलगर्जी झाल्याच्या तक्रारी रोजच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.