माजलगाव : मराठवाड्यातील पहिले वहिले ‘फिरते एटीएम’ माजलगावात सुरु करण्यात येणार आहे. हा अनोखा उपक्रम शहरातील मराठवाडा अर्बन बॅंक राबवत असून, या फिरत्या एटीएम व्हॅनमुळे जनतेची गैरसोय दूर होणार आहे.
शहरात पहिल्यांदाच फिरती एटीएम व्हॅन धावणार आहे. शनिवारी या व्हॅनचे उद्घाटन होणार असून, ही ‘मोबाईल एटीएम व्हॅन’ तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन बँकेची सेवा देणार आहे. पैसे काढणे, पैसे भरणे, पासबुक प्रिटींग आदी सेवा या व्हॅनमध्ये उपलब्ध असणार आहेत. या सेवांचा लाभ दूर अंतरावर राहणाऱ्या ग्राहकांना तसेच वृद्ध आणि निरक्षर लोकांनाही घेता येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी फिरत्या एटीएमचा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे बँकेच्या एटीएम मशीनपुढे रांगेत उभे राहून तांत्रिक अडचणीमुळे काम न झाल्याने उलट पावली परतणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या फिरत्या एटीएम व्हॅनचा फायदा मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना होणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तसेच निराधार व्यक्तींचा बँकेत जमा होणारा पगार त्या-त्या खातेधारकांपर्यंत पोहोचावा, यासाठी या फिरत्या एटीएम सेवेचा विशेष लाभ होणार असल्याची माहिती मराठवाडा अर्बनचे चेअरमन सतीश सावंत यांनी दिली.