अंबाजोगाई : न्यायालयातील खटला वापस घेण्याच्या कारणावरून पत्नीला तोंडी तीन वेळेस तलाक म्हणून घटस्फोट दिल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लीम महिलांच्या विवाहाच्या अधिकारांचे संरक्षणाचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्यानुसार दाखल झालेला हा अंबाजोगाई शहरातील पहिला तर बीड जिल्ह्यातील दुसरा गुन्हा आहे.
याप्रकरणी फिरदौस खाजा सय्यद (वय २०, रा. अंबाजोगाई) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे कि, तीन वर्षापूर्वी तिचे लग्न परळी तालुक्यातील सिरसाळा येथील खाजा बाबू सय्यद याच्यासोबत झाले. या दांपत्याला दोन वर्षांची मुलगी देखील आहे. खाज सय्यद हा वीटभट्टी चालक आहे. एक वर्षापूर्वी खाजाने तू कामावर तरी चल किंवा मला तलाक तरी दे असे म्हणत फिरदौसचा छळ सुरु केला आणि तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर फिरदौस माहेरी अंबाजोगाई येथे राहू लागली.
बुधवारी दुपारी ४ वाजता तिचा पाटी खाजा सय्यद हा तिथे आला आणि न्यायालयातील खटला मागे घे असा तगादा त्याने लावला. मी दुसरे लग्न केले आहे असे म्हणत त्याने तीन वेळेस तलाक, तलाक, तलाक असे म्हणत फिरदौसला तोंडी तलाक दिला. त्यानंतर गुरुवारी फिरदौसने आईसोबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून खाजा सय्यद याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे या करत आहेत.