अंबाजोगाई (बीड ) : आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष गोविंदराव देशमुख, प्रा.गौतम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहाला स्व. डॉ. संतोष मुळावकर साहित्यनगरी असे नाव दिले असून १७ जून रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रात स्व.प्रा.रा.द. आरगडे व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष कुमार सप्तर्षी, उद्घाटक म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. सतीश चव्हाण, माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा.एस.के. जोगदंड, रणजित लोमटे यांची उपस्थिती असेल. माजी प्राचार्य डॉ.साहेबराव गाठाळ, डॉ.विजया इंगोले, डॉ. गणपत राठोड, रविकिरण देशमुख, संतोष लहामगे, दत्ता वालेकर, विद्याधर पंडित, हर्षवर्धन मुंडे, विनोद गायकवाड यांचा सत्कार होईल.
दरम्यान, परिसंवादाचे दुसरे सत्र सकाळी ११ वाजता सुरू होईल. ‘भारतीय शेती, पाणी, नियोजन, व्यवस्थापन’ हा परिसंवादाचा विषय असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी बजरंग सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बच्चू कडू, विक्रम काळे, विचारवंत डॉ. डी. टी. गायकवाड, कालिदास आपेट हे उपस्थित राहतील.
साहित्य संमेलनातील तिसरे सत्र दुपारी ३ वाजता सुरू होईल. हे सत्र पुस्तक संस्कृती विकास प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून परिवर्तन साहित्य मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा परिचय अशा स्वरूपाचे आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी वि. सो. वराट हे असून या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, शीतल बोधले, रामकिसन मस्के, डॉ. गायत्री गाडेकर, प्रा.डॉ.भारत हंडीबाग हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे चौथे सत्र सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. या वेळी जातीय सलोखा या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी खा. रजनी पाटील या उपस्थित राहतील तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. सोमनाथ रोडे, अॅड. मीर फरकुंदअली उस्मानी हे असतील. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विविध पुस्तकांचे होणार प्रकाशनपरिवर्तन साहित्य मंडळाच्या पुस्तक संस्कृती विकास प्रकल्पांतर्गत मान्यवर साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन या संमेलनात केले जाणार आहे. त्यामुळे हे संमेलन वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.