बीड : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर कर्मचारी संघटनेच्या निवडणूकीत पहिल्यांदाच सर्वच्या सर्व पॅनल विजयी झाला. यात बीडच्या दाेघांचा समावेश आहे. बीडची कन्या व सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या राज्य कर निरीक्षक प्रेरणा चव्हाण यांनी सर्वात जास्त मते घेऊन खजिनदार पदावर विराजमान झाल्या आहेत. तर सहखजीनदार म्हणून बीडचेच संतोष वाघ निवडून आले आहेत.
वस्तू व सेवाकर कर्मचारी संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. प्रत्येक तीन वर्षाला ही निवडणूक होत असते. या विभागातील कर्मचाऱ्यांचे राज्यभरात कर्मचाऱ्यांचे जाळे आहे. यावेळी परिवर्तन पॅनल, उत्कर्ष पॅनल आणि स्वाभिमानी पॅनल अशी तिरंगी लढत झाली होती. २५ ऑगस्ट रोजी मतदान तर १४ सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यात परिवर्तन पॅनलचे सर्वच २६ उमेदवार निवडणून आले.
एकाच पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच बहुमताच्या बळावर अध्यक्षपदी संजय मंडले तर सरचिटणीस पदावर अजित भाेसले तर औरंगाबादचे कृष्णा अंभोरे यांची सहचिटणीसपदी निवड झाली. खजिनदार म्हणून बीडची कन्या प्रेरणा चव्हाण यांची तर सह खजीनदार म्हणून बीडचेच संतोष वाघ यांची वर्णी लागली आहे. राज्य कार्यकारिणीवर मराठवाड्यातून हे दोघेच विजयी झाले आहेत. तर औरंगाबाद विभागातून बीड कार्यालयातील पांडूरंग गर्जे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
उच्च पदावर पहिल्यांदाच महिलाकर्मचारी संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच खजीनदारसारख्या राज्यस्तरावील उच्च पदावर महिलेची निवड झाली आहे. एवढेच नव्हे तर बीडच्या प्रेरणा चव्हाण यांनी सर्वात जास्त मते घेऊन विक्रमही केला आहे. प्रेरणा या नेकनूर येथील निवृत्त गटविकास अधिकारी बी.डी.चव्हाण यांची कन्या आहे.