लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘मी बँकेतून बोलतोय, तुमचा १६ अंकी एटीएम क्रमांक आणि त्यानंतर आलेला ओटीपी सांगा’ असे म्हणून पाच जणांचे तब्बल ९७ हजार रुपये लंपास केले. परंतु बीडच्या सायबर क्राईम टीमने यात तत्परता दाखवित यातील ८८ हजार रुपये परत मिळवून दिले. पैसे जरी परत मिळाले असले तरी आरोपी मात्र मोकाट असून त्यांचा शोध या टिमकडून घेतला जात आहे.
मागील काही दिवसांपासून सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. आॅनलाईन, एटीएमचा यामध्ये सर्वाधिक घटना आहेत. तसेच वयोवृद्ध व्यक्तीवर नजर ठेवून मी पैसे काढून देतो, असे म्हणत हजारो रुपये लंपास केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यावर निर्बंध घालण्यासाठीच बीड पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात गत महिन्यात स्वतंत्र ठाणे तयार केले. जिल्ह्यातील प्रत्येक तक्रारीची नोंद येथे घेतली जात आहे.
तक्रार अर्ज प्राप्त होताच येथील टिम कामाला लागते. बँक, मोबाईल कंपनी यांच्या सहकार्याने संबंधित तक्रारदाराला लवकरात लवकर कसे पैसे परत मिळवून देता येतील, यासाठी परिश्रम घेतात. आतापर्यंतच्या पाच गुन्ह्यांमध्ये त्यांना पूर्णपणे यश आले आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. घनश्याम पाळवदे, सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक, पोहेकॉ सलीम शेख, पोना अनिल डोंगरे, संतोष म्हेत्रे, विकी सुरवसे, आसिफ शेख यांनी ही कारवाई केली.
या नागरिकांचे गेले होते पैसे२८ जानेवारी रोजी कुंता बळवंतराव कवणे (पांगरी, परळी) या परिचारीकेचे ३९ हजार ९९९ रूपये एटीएमचा क्रमांक विचारून काढून घेतले होते.३ फेब्रुवारीला माजलगाव येथील मुजाहिद्दीन इस्लाम सिराज एहमद काझी यांचे ४३००० हजार रूपये गेले होते. पैकी १७ हजार रुपये परत देण्यात पोलिसांना यश आले. ८ फेब्रुवारीला बीडमधील आदित्य महाविद्यालयात शिक्षण घेणारा कृष्णा रामराव राठोड (कुप्पा ता.वडवणी) याचे ३ हजार ८०० रुपये गेले होते. १८ फेबु्रवारीला बीडमधील लहू राम मुसारे यांचे ६ हजार ४०६ रुपये गेले होते
तात्काळ तक्रार कराआपली फसवणूक झाल्याचे समजताच तात्काळ संबंधित बँक किंवा पोलिसांशी संपर्क करावा. २४ तासांच्या आत जर पोलिसांपर्यंत गेलात तर पैसे परत मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजताच पैसे गेल्याचा पुरावा घेऊन सायबर टीमला भेटावे, असे आवाहन केले जात आहे.
गोपनीय माहिती देऊ नका - पोलिसांचे आवाहनव्यक्तीगत कोणतीही माहिती इतरांना देऊ नये. तसेच अनोळखी व्यक्तीसोबत आॅनलाईन व्यवहार करू नये, ओटीपी, एटीएम क्रमांक, पेटीएम क्रमांक, आधार क्रमांक अशी कोणतीच माहिती इतरांना देऊ नये. ही माहिती कोणी विचारत असेल तर सावधान रहावे. ती न देता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर टिमने केले आहे.