बीड: घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना सिरसाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले. १८ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता सिरसाळा (ता.परळी) येथे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाचही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांनी एका घरफोडीची कबुली दिली.
१८ ऑगस्ट रोजी पहाटे सिरसाळा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे हे सहकाऱ्यांसमवेत गस्त घालत होते. यावेळी त्यांना अंधारात दडून बसलेले पाच जण आढळून आले. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. कसून चौकशी केली तेव्हा ते गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबल्याचे समोर आले. शेख रहीम शेख चाँद (२४), शेख समीर शेख जमीर (१९), शेख शफीक शेख हमीद (२६), खय्युम शेख रफिक शेख (सर्व रा.जुना पडेगाव रोड, परभणी) व शुभम सुभाष वाल्मीकी (२५, रा. भीमनगर, ता. माजलगाव) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना १९ रोजी परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर २३ ऑगस्टपर्यंत कोठडी वाढविण्यात आली. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी सिरसाळा येथे त्यांनी एका व्यक्तीच्या घरातून एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली.
....
कार केली जप्त
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. सिरसाळ्याच्या घरफोडीदरम्यान चोरी केलेला मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. पाचही जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बीड व परभणी जिल्ह्यात गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी दिली.
......
220821\22bed_10_22082021_14.jpg
घरफोडीतील टोळी