- श्रीकिशन काळे
बीड : कार्बन उत्सर्जन कमी व्हावे आणि पर्यावरण वाचवा, वृक्षारोपण करा, असा संदेश देत पहिल्या वृक्ष संमेलनासाठी पुण्यातून चार आणि सेलू (जि.परभणी) येथून एका तरुणाने सायकलववरून वृक्षसंमेलनस्थळ गाठले. यात एक तरुणी आणि चार तरुणांचा समावेश आहे.
सतेश नाझरे, शीतल साटम, रवींद्र पवार, अभिजित कुरपे हे पुण्यातून गुरूवारी पहाटे ४ वाजता बीडकडे रवाना झाले. सुमारे २७५ किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे. त्यांना हे अंतर कापायला सुमारे बारा तास लागले. सायकल चालवणे हा सतेज नाझरे या तरूणाचा छंद. त्याने आतापर्यंत पुणे-मुंबई, पुणे-कन्याकुमारी, मुंबई-गोवा असे मोठे अंतराचे पल्ले सायकलवर पार केले आहेत. आयटीमधील नोकरी सोडून तो सायकलचा प्रसार करत आहे. सायकल चालवून आरोग्य चांगले राहते आणि कार्बन उत्सर्जन कमी होते. सायकलचा प्रसार करण्यासाठी तो व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुकवर पेजद्वारे आवाहन करतो.
सतेज नाझरे म्हणाला, ‘झाडं लावणं, ती जगवणं किती मोलाचं, कष्टाचं काम आहे हे अनुभवयाला, पहिल्या वृक्ष संमेलनाला सह्याद्री देवराई पालवन येथे सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला. १३ फेब्रुवारी रोजी मी, अभिजित कुरपे व शीतल साटम या सायकल चमूसह पुण्याहून सायकलवर निघालो. तुम्हाला शहरात झाडं लावणं, ती जोपासणं अवघड काम वाटत असलं तरी एखादं झाड देवराई वनराईत लावून ते झाड दरवर्षी पाहायला तुम्ही पिकनिकला जाऊ शकता.’
विद्यार्थ्यांची सायकलस्वारीबीड शहरातील अनेक विद्यार्थी सायकलवर आले होते. त्यांनी सायकल वापरा, प्रदूषण टाळा, असाच संदेश जणू यातून दिला. अतिशय उत्साहात हे विद्यार्थी संमेलनात सहभागी झाले आणि त्यांनी येथील विविध स्टॉलवरील माहितीचा आनंद लुटला.
सायकल चालवा, प्रदूषण टाळासेलू येथील वृक्षप्रेमी तथा केंद्रीय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कला शिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता सायकलवर सेलू येथून देवराई बीडकडे प्रस्थान केले. सायंकाळी पावणेआठ वाजता ते बीड येथे पोहोचले. सायकलपटू आणि सामाजिक कार्यकर्ते परभणीचे डॉ.पवन चांडक यांची प्रेरणा घेऊन निघालो. प्रदूषण टाळण्यासाठी सायकल वापरा, झाडे लावा, पर्यावरण राखा, हा संदेश देण्यासाठी सायकलवारी केल्याचे पाटणकर सांगतात.
दररोज शहरात तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने कार्बन उत्सर्जन नक्की कमी करू शकता, याविषयी जागृती हाच आमच्या पुणे ते पालवण, बीड व परत पुणे या सायकल दौऱ्यामागचा उद्देश आहे. या जगात फुकट घेता येतो तो आॅक्सिजन. त्याची किंमत आपल्या लेखी अजून तरी नाही. तो तयार करणाऱ्या नवीन नैसिर्गक यंत्रांना भेटायला आम्ही आलो आहे. - सतेज नाझरे, सायकलपटू, पुणे