कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या
अंबाजोगाई : सकारात्मक विचार, योग्य उपचार व व्यवस्थित काळजी घेतल्यास कोरोनावर यशस्वीरीत्या मात करता येते. याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील कुलकर्णी कुटुंबीयांनी समोर ठेवला आहे. कुटुंबातील पाच जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कुलकर्णी कुटुंबात तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. मुलगा बाधित झाल्याने संपूर्ण कुटुंबच हळूहळू बाधित झाले; पण न घाबरता सर्वांनी योग्यवेळी कोरोनाच्या चाचण्या केल्या. यात सेवानिवृत्त शिक्षक असलेले ८६ वर्षीय आजोबा वसंतराव कुलकर्णी, त्यांच्या पत्नी पुष्पाबाई, मुलगा दीपक, सूनबाई भारती व नात दिव्या पॉझिटिव्ह निघाले. आजोबांना ज्यास्त त्रास नसला तरी त्यांचे वय पाहता त्यांना लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. ओंकार ताथोडे, डॉ. प्रवीण जोशी यांच्या टीमने आजोबा व आजीवर यशस्वी उपचार केले. डॉक्टरांनी धीर देत केलेले उपचार व प्रबोधनामुळे रुग्णालयात कसलीही अडचण आली नाही. येथील डॉक्टर कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी, त्याप्रमाणे काळजी घेतात. याचा अनुभव आल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
पायी चालणे, योगासनांमुळे
प्रतिकारशक्ती मजबूत
सेवानिवृत्त शिक्षक असलेले वसंतराव कुलकर्णी हे ८६ वर्षे वयाचे असून, सद्य:स्थितीतही दररोज सकाळी दोन किलोमीटर अंतर फिरून येतात व नियमित योगासने करतात. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती आजही तरुणांना लाजविणारी आहे.
आता आम्ही कुटुंबातील सर्व जण ठणठणीत बरे झालो आहोत. कोणालाही कसला त्रास नाही.
कोरोनाला घाबरू नका. सकारात्मक विचार ठेवा. नियमित व्यायाम करा. तुम्ही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करू शकता.
-वसंतराव कुलकर्णी
घाबरून न जाता योग्य उपचार घ्या. आजार अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर योग्य ती खबरदारी घेतली की, कोरोना १०० टक्के बरा होतो. ज्यांना कोरोना झालाय त्यांना धीर द्या. त्यांचा तिरस्कार करू नका. या आजारातून बरे होण्यासाठी धीर देणे महत्त्वाचे ठरते. -पुष्पाबाई कुलकर्णी
स्वतः कोरोना पाॅझिटिव्ह आल्यास ते न लपविता इतरांना स्वतःपासून दूर ठेवा. तेव्हाच कोरोनाचा संसर्ग आपणास रोखता येईल.
-दिव्या कुलकर्णी
कोणतीही व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला मानसिक आधार व धीर द्या. यामुळे रुग्णास आधार व समाधान मिळते. कोरोनाची अनेकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीस नातेवाईक, मित्रपरिवाराने आधार दिला पाहिजे.
-दीपक कुलकर्णी
===Photopath===
090521\avinash mudegaonkar_img-20210429-wa0019_14.jpg