बीड : शहरातील बार्शी नाका परिसरात येणाऱ्या महावितरणच्या पथक क्रमांक ३ ला पाच महिन्यांनंतर हक्काचे अभियंता मिळाले आहेत. उस्मानाबादहून आलेले उमेश कसबे यांनी शुक्रवारी सहायक अभियंताचा पदभार स्वीकारला. कसबे यांनी यापूर्वीही बीड उपविभागात काम केलेले असल्याने त्यांना अनुभव आहे.
बीड शहरात महावितरणचे ५ पथके आहेत. पथक क्रमांक ३ अंतर्गत बार्शी नाका परिसर येतो. येथे जवळपास १० हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. तसेच इमापूर रोडवरील ३३ बाय ११ उपकेंद्रही आहे. या कार्यालयात मागील साधारण पाच महिन्यांपासून हक्काचे अभियंता नव्हते. येथील अतिरिक्त पदभार कार्यालयातील कनिष्ठ अभियंता राहुल केकान यांच्याकडे देण्यात आला होता. वीजपुरवठ्यासंदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या. आता उस्मानाबादहून आलेले उमेश कसबे यांची सहायक अभियंता म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला. कसबे रूजू होताच इतर सहायक अभियंता व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
मी पदभार स्वीकारला आहे. सुरळीत वीजपुरवठा आणि चांगली सेवा देणे हे माझे कर्तव्य आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न राहील. ग्राहकांनीही सहकार्य करावे.
उमेश कसबे
सहायक अभियंता, पथक क्र.३ बीड शहर