लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आरामदायी आणि अद्यायावत अशा आणखी पाच बसेस बीड आगाराला येणार आहेत. कोल्हापूरला या गाड्यांची बांधणी झाली असून आठवड्यात त्या बीड रापमच्या ताफ्यात जमा होतील. यापूर्वी एक बस बीड आगाराला मिळाली असून आता एकूण सहा शिवशाही बीडमध्ये धावणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने खाजगी बसेससारखीच सेवा देवून प्रवाशी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशी खाजगी बसेसचा आधार घेत असल्याचे वारंवार समोर आले होते. हाच धागा पकडून रापमने खाजगी बसेसपेक्षाही अद्यावत व सोयी सुविधायुक्त अशी शिवशाही बसची बांधणी केली. बीडला यापूर्वी एक बस प्राप्त झाली होती.
ही बस बीड-पुणे अशी धावत होती. आता आणखी पाच बसेस येणार असून आठवड्यात त्याही बीड-पुणे धावतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या बस गाड्यांसाठी तत्कालिन प्रभारी विभागीय नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी पाठपुरावा केला होता. तसेच सध्याचे विभागीय नियंत्रक जी.एम.जगतकर, विभागीय वाहतूक अधिकारी उद्धव वावरे यांच्या हस्ते यापूर्वीच्या बसचे उद्घाटन झाले होते.